• संजू सॅमसनची मॅचविनिंग खेळी
  • सुपर ८ मधील अंतिम सामन्यात वेस्टइंडिजचा ५ विकेट्सने धुव्वा

कोलकाता : आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील सुपर ८ फेरीतील निर्णायक सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर ५ विकेट्सने दमदार विजय मिळवत सेमी फायनलमध्ये धडक मारली. कोलकाता येथील ईडन गार्डन मैदानावर झालेल्या या सामन्यात विजयासाठी १९६ धावांचे आव्हान पार करताना संजू सॅमसनने नाबाद ९७ धावांची अप्रतिम खेळी साकारत संघाला विजय मिळवून दिला.

१९६ धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात डळमळीत झाली. अभिषेक शर्मा (१०) आणि ईशान किशन (१०) स्वस्तात माघारी परतले. कर्णधार सूर्यकुमार यादव याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती; मात्र तो १८ धावांवर बाद झाला.

यानंतर तिलक वर्मा आणि संजू सॅमसन यांनी डाव सावरत महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. तिलक २७ धावांवर बाद झाला. हार्दिक पांड्या याने १७ धावांचे योगदान दिले. मात्र संजू सॅमसन शेवटपर्यंत क्रीजवर ठाम उभा राहिला. त्याने नाबाद ९७ धावांची खेळी करत भारताचा विजय निश्चित केला.

प्रारंभी , नाणेफेक जिंकून भारताने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिजने ४ गडी बाद १९५ धावा केल्या. शे होप (३२) आणि रोस्टन चेसने (४०) यांनी पहिल्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी केली. शिमरन हेटमायरला २७ धावांवर बाद झाला, तर रुथरफोर्डने १४ धावा केल्या. शेवटच्या षटकांत रोमन पॉवेलने (नाबाद ३४) आणि जेसन होल्डरने (नाबाद ३७) यांनी धावा जोडत संघाला १९५ पर्यंत मझल मारून दिली. महत्त्वाच्या सामन्यात दडपणाखाली खेळताना भारताने संयम राखत विजय मिळवला आणि सेमी फायनलच्या दिशेने दमदार पाऊल टाकले.