• रोमांचक सामन्यात इंग्लंडचा ७ धावांनी धुव्वा
  • विजेतेपदासाठी न्यूझीलंडशी लढत

मुंबई : वानखेडेच्या ऐतिहासिक मैदानावर टी-२० विश्वचषक २०२६ च्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात टीम इंडियाने बलाढ्य इंग्लंडचा ७ धावांनी धुव्वा उडवत दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला. संजू सॅमसन, ईशान किशन आणि शिवम दुबे यांच्या वादळी फलंदाजीच्या जोरावर भारताने २५३ धावांचा डोंगर उभा केला होता. त्याला इंग्लंडकडून जेकब बेथेलने शेवटपर्यंत एकाकी झुंज दिली. मात्र इंग्लंडचा संघ २४६ धावांत गारद झाला.

२५४ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात पण धक्कादायक झाली. हार्दिक पांड्याने दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर भारताला पहिले यश मिळवून देत फिल साल्टला ५ धावांवर बाद केले.त्यानंतर हॅरी ब्रूकही मोठी खेळी करू शकला नाही, तो ७ धावा करून जसप्रीत बुमराहच्या चेंडूवर अक्षर पटेलकडे झेल देत माघारी परतला. जोस बटलर मात्र चांगल्या लयीत दिसत होता, पण त्याची खेळीही फार काळ टिकली नाही. २५ धावांवर असताना फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने त्याचा त्रिफळा उडवत इंग्लंडला मोठा धक्का दिला. यानंतर टॉम बॅन्टनने (१७) अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर दोन गगनचुंबी षटकार ठोकत प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र अक्षर पटेलनेच त्याला लगेच बाद करत इंग्लंडला आणखी एक धक्का दिला. जेकब बेथेलने एकाकी झूज दिली. त्याने आधी अवघ्या १९ चेंडूमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर त्याने ४५ चेंडूत शतक ठोकले, पण तो संघाला विजय मिळून देऊ शकला नाही.

प्रारंभी इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकने नाणेफेक जिंकून टीम इंडियाला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिले. मात्र टीम इंडियाची सुरुवात काहीशी निराशाजनक झाली. सलामीवीर अभिषेक शर्मा पुन्हा एकदा अपयशी ठरला. त्याने ७ चेंडूत २ चौकारांच्या मदतीने केवळ ९ धावा केल्या. पण, यानंतर संजू सॅमसन आणि ईशान किशन यांनी डाव सावरत भारतीय संघाला शंभरी पार करून दिली. ईशान किशनने आक्रमक फलंदाजी करत १८ चेंडूत ३९ धावा केल्या.

दुसऱ्या बाजूला संजू सॅमसनने धडाकेबाज अर्धशतक झळकावले. तो ४२ चेंडूत ७ चौकार आणि ७ षटकारांच्या जोरावर ८९ धावा करून बाद झाला. सॅमसन बाद झाल्यानंतर शिवम दुबेने तुफानी फलंदाजी करत २५ चेंडूत ४३ धावा ठोकल्या. मात्र, दुर्दैवाने तो धावबाद झाला. दुसरीकडे सूर्यकुमार यादव पुन्हा एकदा अपयशी ठरला. त्याला ६ चेंडूत ११ धावा करता आल्या. यानंतर तिलक वर्माने अवघ्या ७ चेंडूत ३ षटकारांसह २१ धावांची झंझावाती खेळी केली, तर हार्दिक पांड्याने १२ चेंडूत २७ धावा जलदगतीने धावा जमविल्या. जोरावर भारताने २० षटकांत ७ बाद २५३ धावांचा डोंगर उभारला.

आता रविवारी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी-२० विश्वचषक २०२६ चा अंतिम सामना रंगणार आहे.