• प्रसिद्ध कृष्णा अन् मोहम्मद सिराजने इंग्लंडच्या तोंडचा घास पळवला
  • मालिका 2-2 ने बरोबरीत संपली

केनिंग्टन : गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून रंगलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेचा अखेर निर्णायक शेवट झाला. केनिंग्टन ओव्हल मैदानावर रंगलेल्या पाचव्या आणि अंतिम कसोटीत टीम इंडियाने इंग्लंडवर ऐतिहासिक विजय मिळवत मालिका 2-2 अशी बरोबरीत आणली. इंग्लंडसमोर 374 धावांचे विशाल लक्ष्य होते. पण हॅरी ब्रूक आणि जो रूट या दोघांनी मिळून इंग्लंडच्या विजयाच्या आशा प्रबळ केल्या. दोघांनीही शतके ठोकून सामना भारताच्या हातातून निसटतो की काय, असा क्षण आला.

पण शेवटी भारताच्या वेगवान माऱ्यासमोर इंग्लंड संघाने गुडघे टेकले. प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराज या जोडीने शेवटच्या सत्रात माऱ्याची धार वाढवली आणि इंग्लंडचा डाव 367 धावांवर आटोपला. या विजयाने भारताने केवळ सामना नव्हे, तर मालिकाही वाचवली.

  • भारताचा पहिला डाव – ॲटकिन्सनचा कहर :

भारताने प्रथम फलंदाजी करताना केवळ 224 धावांत आपला पहिला डाव गमावला. करुण नायरने 57 धावा करत सर्वाधिक योगदान दिलं. साई सुदर्शन (38) आणि वॉशिंग्टन सुंदर (26) यांनीही काहीसा आधार दिला. इंग्लंडकडून गस ॲटकिन्सनने शानदार कामगिरी करत 5 बळी घेतले, तर जोश टंगला 3 आणि क्रिस वोक्सला 1 बळी मिळाला.

  • इंग्लंडचा पहिला डाव – सिराज व कृष्णाचा दणका : 

इंग्लंडने पहिल्या डावात 247 धावा करत 23 धावांची आघाडी घेतली. झॅक क्रॉलीने 64, बेन डकेटनं 43 आणि हैरी ब्रूकने 53 धावा केल्या. भारताकडून मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी 4 गडी बाद करत इंग्लंडच्या डावाला झटका दिला.

  • भारताचा दुसरा डाव – यशस्वीचा शानदार शतकावर मोहोर :

दुसऱ्या डावात यशस्वी जैस्वालने दमदार शतक ठोकले. त्याने 164 चेंडूंमध्ये 118 धावा केल्या. आकाश दीपने नाईटवॉचमन म्हणून येत 66 धावांची झुंजार खेळी केली. जडेजा आणि सुंदरने प्रत्येकी 53 धावा करत भारताचा डाव 396 पर्यंत पोहोचवला. इंग्लंडकडून जोश टंगने पुन्हा 5 विकेट घेतल्या.

  • इंग्लंडचा दुसरा डाव – ब्रूक-रूटचं शतक, अखेरच्या क्षणी सिराजचा डबल धमाका :

धावांचा पाठलाग करताना इंग्लंडकडून हॅरी ब्रूक आणि जो रूट यांनी शतके झळकावली. ब्रूकने 98 चेंडूंत 111 धावा केल्या. तर जो रूटने 152 चेंडूंत 12 चौकारांच्या मदतीने 105 धावा केल्या. रूट आणि ब्रूक यांच्यात चौथ्या विकेटसाठी 195 धावांची भागीदारी झाली, ज्यामुळे इंग्लंडला या सामन्यात पुनरागमन मिळाले. सलामीवीर बेन डकेटनेही 54 धावांची उपयुक्त खेळी खेळली. सामन्यात ट्विस्ट चौथ्या दिवसाच्या खेळाच्या तिसऱ्या सत्रात आला, जेव्हा जेकब बेथेल आणि जो रूट यांना वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने सलग दोन षटकांत पॅव्हेलियनमध्ये पाठवले.