- खानापूर – बेळगाव राष्ट्रीय महामार्गावरील घटना
खानापूर / प्रतिनिधी
खानापूर – बेळगाव राष्ट्रीय महामार्गावर प्रभुनगरजवळ दुचाकीवरून प्रवास करताना सुट्टीवर आलेल्या एका जवानाचा भीषण अपघातात मृत्यू झाला. सुरज मोहन द्रौपदकर (वय २८, रा. मयेकरनगर, खानापूर) असे त्या दुर्दैवी जवानाचे नाव आहे. आज गुरुवारी दुपारी अंदाजे १.३० वा. सुमारास पोलिस स्थानकाच्या हद्दीत ही घटना घडली.
हा अपघात इतका भीषण होता की, सदर जवान रस्त्यावर दूर फेकला गेल्याने डोक्याला गंभीर इजा होऊन जागीच गतप्राण झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अपघातग्रस्त दुचाकीचा नंबर केए २२ एच के ८४९४ असून यामाहा एफझेड कंपनीची आहे. घटनेची माहिती मिळताच खानापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी खानापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवला. याप्रकरणी खानापूर पोलिसांचा पुढील तपास सुरु आहे.