नवी दिल्ली : शिवसेना हे पक्षनाव व धनुष्य-बाण हे निवडणूक चिन्ह कोणाला बहाल केले जाणार यावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये होणार आहे. या संदर्भातील हस्तक्षेप याचिकेवर सोमवारी झालेल्या सुनावणीमध्ये न्या. सूर्यकांत यांच्या खंडपीठाने आता मूळ याचिकेवर सुनावणी घेऊन निकाल देण्याची वेळ आली असल्याचे स्पष्ट केले.

राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या असून या निवडणुकीपूर्वी पक्षनाव व निवडणूक चिन्हाबाबत सुनावणी केली जावी, अशी हस्तक्षेप याचिका सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली आहे. धनुष्य-बाण हे निवडणूक चिन्ह गोठवले जावे, अशी मागणी शिवसेनेच्या ठाकरे गटाने केली आहे. मात्र सोमवारी न्या. सूर्यकांत यांच्या खंडपीठाने या मुद्दयावर सुनावणी न घेता मूळ आव्हान याचिकेवरच सुनावणी घेतली जाईल, असे स्पष्ट केले.

हे प्रकरण दोन वर्षांपासून प्रलंबित आहे, आता दोन्ही पक्षांकडून अर्ज दाखल करणे बंद केले पाहिजे. मूळ आव्हान याचिकेवर सुनावणी घेऊन ऑगस्टमध्ये हे प्रकरण निकाली काढले जाईल. त्यासाठी ऑगस्टमध्ये सुनावणीसाठी तारीख निश्चित केली जाईल, असे न्या. सूर्यकांत यांनी सोमवारी सुनावणीवेळी ठाकरे गटाचे वकील कपिल सिबल यांना सांगितले. ऑगस्टमध्ये सुनावणी झाली तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी शिवसेना पक्ष ठाकरे गटाचा की, शिंदे गटाचा हे स्पष्ट होऊ शकेल.