• पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा ३० धावांनी विजय
  • अडीच दिवसात सामना जिंकला
  • दोन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी अजिंक्य आघाडी

कोलकाता : येथील ईडन गार्डन्स मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने भारतावर ३० धावांनी मात करून अडीच दिवसात सामना जिंकला. तिसऱ्या दिवशी भारतापुढे विजयासाठी १२४ धावांचे लक्ष्य होते, पण भारताचा दुसरा डाव अवघ्या ९३ धावांवर आटोपला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने दोन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी अजिंक्य आघाडी घेतली आहे.

  • दुसऱ्या डावात भारताची सुरुवातीपासूनच पडझड : 

१२४ धावांचा पाठलाग करताना मार्को यान्सनच्या फसव्या चेंडूवर यशस्वी जैस्वाल विकेटकीपरकडे झेल देऊन बाद झाला. यान्सनच्या उसळत्या चेंडूचा राहुलला अंदाज आला नाही. ध्रुव जुरेलने चांगली सुरुवात केली. जुरेल आणि वॉशिंग्टन सुंदर भागीदाराने आशा पल्लवित केल्या. स्थिरावलेला असताना जुरेलने कार्बिन बॉशच्या हातात झेल दिला. ऋषभ पंतकडून भारतीय संघाला मोठ्या अपेक्षा होत्या. पण तो २ धावा करून तंबूत परतला. जडेजाने सुंदरला साथ दिली. पण हार्मेरने त्याला पायचीत केले. एडन मारक्रमने सुंदरची खेळी संपुष्टात आणली. त्याने ९२ चेंडूत ३१ धावा केल्या. कुलदीप यादवही झटपट तंबूत परतला. सहकारी बाद होत असल्यामुळे अक्षर पटेलने केशव महाराजविरुद्ध आक्रमक पवित्रा स्वीकारला. त्याने चौकार, षटकार वसूल केला. मात्र त्याच षटकात आणखी एक मोठा फटका खेळायचा त्याचा प्रयत्न तेंबा बावूमाच्या हातात जाऊन विसावला. अक्षरने २६ धावा केल्या. महाराजने सिराजला बाद केले आणि दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी एकच जल्लोष केला. दुखापतीमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने कर्णधार शुबमन गिल फलंदाजीला येऊ शकला नाही. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप विजेत्या दक्षिण आफ्रिकेने साजेसा खेळ करत यजमानांना चीतपट करण्याची किमया साधली.

  • पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांचे बुमराहसमोर लोटांगण :

दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. कागिसो रबाडा दुखापतग्रस्त झाल्याने कार्बिन बॉशला अंतिम अकरात संधी मिळाली. भारतीय संघाने कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर आणि रवींद्र जडेजा अशा चार फिरकीपटूंसह खेळण्याचा निर्णय घेतला. गोलंदाजांसाठी अनुकूल अशा खेळपट्टीवर जसप्रीत बुमराहने दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांची भंबेरी उडवली. ५५व्या षटकात दक्षिण आफ्रिकेचा डाव १५९ धावांतच गुंडाळला. ९ फलंदाज संघात असूनही दक्षिण आफ्रिकेला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. सलामीवीर एडन मारक्रमची ३१ धावांची खेळी सर्वाधिक ठरली. बुमराहने १४ षटकात २७ धावांच्या मोबदल्यात रायन रिकलटन, एडन मारक्रम, टोनी द झोरी, सिमोन हार्मेर आणि केशव महाराज अशा पाचजणांना तंबूत धाडले. मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादवने प्रत्येकी २ विकेट्स घेत बुमराहला चांगली साथ दिली.

  • पहिल्या डावात आघाडी मिळूनही भारताने विजयाची संधी गमावली : 

पहिल्या दिवसअखेर भारताने एका विकेटच्या मोबदल्यात ३७ धावा केल्या. के.एल.राहुल आणि तिसऱ्या क्रमांकावर बढती देण्यात आलेला वॉशिंग्टन सुंदर यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण केशव महाराजने राहुलला तर सिमोन हार्मेरने सुंदरला बाद केले. राहुलने ३९ तर सुंदरने २९ धावांची खेळी केली. मानेच्या दुखापतीमुळे शुबमन गिल रिटायर्ड हर्ट होऊन परतला. आक्रमक खेळासाठी प्रसिद्ध ऋषभ पंतने नेहमीच्या इराद्याने खेळायला सुरुवात केली. मात्र कार्बिन बॉशच्या उसळत्या चेंडूवर तो फसला. त्याने २७ धावा केल्या. रवींद्र जडेजाने २७ धावांची खेळी करत प्रतिकार केला. पण दक्षिण आफ्रिकेच्या शिस्तबद्ध माऱ्यासमोर भारतीय संघाने नांगी टाकली. भारताचा डाव १८९ धावात आटोपला. भारतीय संघाला अल्प आघाडी मिळाली. दक्षिण आफ्रिकेतर्फे हार्मेरने ४ तर मार्को यान्सनने ३ विकेट्स घेतल्या.

  •  दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेची पडझड मात्र तेंबा बावूमाची चिवट खेळी : 

दुसऱ्या डावातही दक्षिण आफ्रिकेची पडझड सुरूच राहिली. पण कर्णधार तेंबा बावूमाने खेळपट्टीचा नूर ओळखत नांगर टाकला. एका बाजूने नियमित अंतरात सहकारी तंबूत परतत असतानाही तेंबाने किल्ला लढवला. चेंडूला असमान उसळी आणि फिरकी मिळत असताना तेंबा चिवटपणे खेळत राहिला. तेंबाने १३६ चेंडूत ५५ धावांची आश्वासक खेळी साकारली. कार्बिन बॉशने २५ धावा करत त्याला चांगली साथ दिली. तेंबा-बॉश भागीदारीमुळे भारतीय संघाला मोठे लक्ष्य मिळाले. दक्षिण आफ्रिकेचा डाव १५३ धावांतच आटोपला. रवींद्र जडेजाने ४ विकेट्स घेतल्या. कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.