- कडक पोलीस बंदोबस्त
कोल्हापूर : चैत्र यात्रेचा मुख्य दिवस १ एप्रिल असल्याने श्री जोतिबा मंदिर भाविकांसाठी विशेष वेळापत्रकानुसार खुले ठेवण्यात आले आहे. मंगळवार, ३१ मार्चच्या पहाटे मंदिराचे दरवाजे उघडल्यानंतर ते शुक्रवार, ३ एप्रिल रात्री ११ वाजेपर्यंत अखंड खुले राहणार असून, भाविकांना तब्बल ७९ तास सतत दर्शनाची संधी मिळणार आहे.
यात्रेच्या पार्श्वभूमीवर डोंगर परिसरात भाविकांची गर्दी वाढू लागली असून उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. यंदा यात्रेत भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य देतानाच प्लास्टिकमुक्त यात्रा करण्याचा संकल्प प्रशासनाने केला आहे. याशिवाय भेसळयुक्त गुलाल, पेढे व अन्य खाद्यपदार्थांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तपासणी मोहीम सुरू आहे.
पार्किंग व्यवस्था, अन्नछत्र, दर्शन रांगेचे नियोजन, सीसीटीव्ही यंत्रणा, पोलीस बंदोबस्त, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा, स्वच्छता, शौचालये, वीज व लाईव्ह दर्शन यांसारख्या सुविधा युद्धपातळीवर उभारण्यात येत आहेत. संवेदनशील भागांवर ड्रोनच्या माध्यमातून देखरेख ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सर्वांनी सहकार्य करून यात्रा सुरळीत पार पाडावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.
मंदिर परिसरात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून यात्रेदिवशी स्क्रीनवरून थेट दर्शनाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. दर्शन रांगेतील भाविक, सासनकाठीधारक, स्वयंसेवी संस्था व अन्नछत्रांना देवस्थान समितीकडून आवश्यक ते सहकार्य दिले जाणार असल्याची माहिती प्रभारी अधिकारी धैर्यशील तिवले यांनी दिली.
दरम्यान, बुधवारपासून धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू होणार आहे. पहाटे चार वाजता पाद्यपूजा, काकड आरती व मुखमार्जन होईल. त्यानंतर पहाटे पाच ते सहा या वेळेत शासकीय महाभिषेक पार पडेल. सकाळी सात वाजता महापोशाख व महापूजा होऊन सात ते दहा या वेळेत मंदिर दर्शनासाठी खुले राहील. दुपारी धुपारती व अंगारा वाटप, तर दुपारी एक वाजता सासनकाठ्यांची मिरवणूक निघेल.
सायंकाळी साडेपाच वाजता तोफेच्या सलामीने पालखी सोहळ्याची सुरुवात होऊन मिरवणूक काढली जाईल. रात्री आठ वाजता यमाई मंदिरात धार्मिक विधी व आतषबाजी होईल. त्यानंतर पालखी पुन्हा जोतिबा मंदिराकडे परत येऊन प्रदक्षिणा, मानपान व पारंपरिक कार्यक्रम पार पडतील.
यात्रेच्या सुरक्षेसाठी पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यात वरिष्ठ अधिकारी, निरीक्षक, उपनिरीक्षक, महिला पोलीस, वाहतूक शाखा, शीघ्र कृती दल, एसआरपी, होमगार्ड तसेच इतर यंत्रणांचा समावेश आहे.








