• आमचे सरकार शेतकरी हिताचे ; मुख्यमंत्री सिद्धरामय्या

बेळगाव / प्रतिनिधी

शेतकरी, कृषी विभाग आणि साखर विभाग यांच्यात योग्य समन्वय असून नवीन प्रकल्प व आधुनिक यंत्रसामग्रीची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहे. आमचे सरकार शेतकरी हिताचे असून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी वचनबद्ध आहे, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले.

बेळगाव तालुक्यातील हुदली गावात साखर कारखान्यांच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या एकात्मिक माती व पाणी व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन, पाण्याचा कार्यक्षम वापर आणि संतुलित पोषक तत्त्व व्यवस्थापन प्रकल्पाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, भारत हा कृषीप्रधान देश असून सुमारे ६० टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. मातीचे आरोग्य आणि पाणी व्यवस्थापनाकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. रासायनिक खतांच्या अति वापरामुळे जमिनीची सुपीकता घटते, त्यामुळे शाश्वत शेती पद्धती अवलंबणे गरजेचे आहे. शेतीसाठी अनावश्यक पाण्याचा वापर टाळावा, यासाठी सरकार ठिबक सिंचन योजनांना अधिक प्रोत्साहन देत आहे.

यावेळी जिल्हा पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले की, इतर देशांमध्ये कमी जमीन व पाण्याच्या वापरातून शेतकरी दोन ते तीनपट अधिक उत्पन्न घेत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास आपले शेतकरीही जास्त उत्पन्न मिळवू शकतात. शेतकऱ्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

या कार्यक्रमास महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, मंत्री चालुवर्यस्वामी, सरकारी मुख्य सचेतक अशोक पट्टण, बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.