- पुण्यातील रुबी रुग्णालयात उपचार सुरू
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा खासदार शरद पवार यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बारामतीत असताना त्रास जाणवल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी केली आणि पुढील उपचारांसाठी त्यांना पुण्याला हलवण्यात आले.
सध्या पवार यांना सर्दी, ताप, खोकला आणि श्वास घेण्यास अडचण जाणवत असल्याची माहिती आहे. रुग्णालयात त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असून खबरदारी म्हणून भेटीगाठींवर मर्यादा घालण्यात आल्या आहेत. त्यांच्यासोबत पत्नी आणि खासदार सुप्रिया सुळेही रुग्णालयात उपस्थित आहेत.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार पवार यांची प्रकृती स्थिर आहे. प्राथमिक तपासणीत हृदयाचे ठोके आणि ऑक्सिजन पातळी सामान्य आढळली असून केवळ श्वसनाचा वेग थोडा वाढलेला आहे. कोणतीही गंभीर बाब नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले असून पुढील उपचार अहवालानुसार ठरवले जाणार आहेत.







