- सीमाभागातील नागरिक आणि संघटनांचे लक्ष लागले
बेळगाव / प्रतिनिधी
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी उद्या बुधवार दि. २१ जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या दिवशी मूळ दाव्यावर सुनावणी होण्याची शक्यता असून, संपूर्ण सीमाभागातील नागरिक आणि संघटनांचे लक्ष न्यायालयात लक्ष आहे.
सीमाप्रश्नी महाराष्ट्राच्या वतीने वरिष्ठ विधिज्ञ ॲड. सी. एस. वैद्यनाथन आणि ॲड. ऑन रेकॉर्ड शिवाजी जाधव यांनी सुनावणी लवकरात लवकर व्हावी, अशी विनंती सर्वोच्च न्यायालयात केली होती. न्यायमूर्ती संजय कुमार आणि न्यायमूर्ती आलोक आराध्ये यांनी ही विनंती मान्य करून बुधवारी सुनावणी निश्चित केली आहे.
या याचिकेची सुरुवात २००४ मध्ये महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात केली होती. या प्रकरणात केंद्र सरकार प्रतिवादी क्रमांक एक आणि कर्नाटक सरकार प्रतिवादी क्रमांक दोन आहेत. सुरुवातीपासूनच दोन्ही प्रतिवादींकडून वेळकाढूपणा केला गेला, तर २०१३ मध्ये साक्षी व पुरावे तपासण्यासाठी कोर्ट कमिशन नेमण्यात आले. कर्नाटकाने नंतर फेरविचार याचिका दाखल करून पुन्हा वेळकाढूपणा केला, आणि शेवटची सुनावणी २०१७ मध्ये पार पडली होती.
सीमाभागातील नागरिक आणि संघटना या सुनावणीपासून योग्य निकालाची अपेक्षा करत आहेत, ज्यामुळे या प्रकरणावर अंतिम निर्णय लवकर येईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.








