• सर्वोच्च न्यायालयात लवकरच सुनावणीची शक्यता

बेळगाव / प्रतिनिधी

महाराष्ट्र–कर्नाटक सीमाप्रश्नी दीर्घकाळ रखडलेली न्यायालयीन प्रक्रिया आता निर्णायक टप्प्यावर असल्याचे संकेत मिळत आहेत. सर्वोच्च न्यायालयात १६ फेब्रुवारीपासून तीन सदस्यीय खंडपीठ उपलब्ध होणार असल्याने सीमावादावर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येत्या दोन दिवसांत सुनावणीची अधिकृत तारीख निश्चित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्र–कर्नाटक सीमावादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सातत्याने पुढे ढकलली जात असल्याने महाराष्ट्र सरकारतर्फे ऑक्टोबर २०२५ मध्ये तातडीने सुनावणी घेण्याची मागणी करणारा अर्ज दाखल करण्यात आला होता. या अर्जावर २१ जानेवारी २०२६ रोजी सुनावणी करताना, मूळ दाव्यानुसार प्रकरण घेतले जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते. त्यानुसार महाराष्ट्र सरकारने आवश्यक तयारीही केली होती.

मात्र २१ जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात तीन सदस्यीय खंडपीठ उपलब्ध नसल्यामुळे अपेक्षित सुनावणी होऊ शकली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा खंडपीठ उपलब्ध करून देण्यात यावे, यासाठी महाराष्ट्र सरकारने आवश्यक हालचाली सुरू केल्या. या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे सातत्याने वकिलांशी संपर्क साधून न्यायालयीन प्रक्रियेचा पाठपुरावा करण्यात येत होता.

आता १६ फेब्रुवारीपासून सर्वोच्च न्यायालयात तीन सदस्यीय खंडपीठ उपलब्ध होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महाराष्ट्र–कर्नाटक सीमाप्रश्नी लवकरच सुनावणी निश्चित होणार असून, पुढील दोन दिवसांत सुनावणीची तारीख जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सीमाभागातील नागरिकांच्या दृष्टीने ही घडामोड महत्त्वाची मानली जात आहे.