• सम्राट अशोक चौकात शिवसेना – महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने श्रद्धांजली कार्यक्रम

बेळगाव / प्रतिनिधी

सीमालढ्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शिवसेनेच्या ६७ हुतात्म्यांना आज बेळगावात अभिवादन करण्यात आले. शिवसेना आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आयोजित या श्रद्धांजली कार्यक्रमात शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग घेत हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

बेळगाव शहरातील रामलिंग खिंड गल्ली येथील सम्राट अशोक चौकात असलेल्या शहीद स्मारकावर मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. दरवर्षीप्रमाणे यंदाही सीमालढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या ६७ जणांच्या स्मृतिप्रीत्यर्थ श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परिसर ‘हुतात्मे अमर रहे’च्या घोषणांनी दुमदुमून गेला.

कार्यक्रमात बोलताना महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे नेते शुभम शेळके यांनी सीमालढ्यात शिवसेनेच्या ६७ कार्यकर्त्यांनी दिलेल्या बलिदानाचे स्मरण करून दिले. हे बलिदान कधीही विसरता कामा नये. सीमालढ्याचे गांभीर्य ओळखून प्रत्येकाने निष्ठेने आणि प्रामाणिकपणे कार्य केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. अन्य मान्यवरांनीही मनोगत व्यक्त करत हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली.

या श्रद्धांजली कार्यक्रमाला महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस व माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे, शुभम शेळके, माजी नगरसेवक नेताजी जाधव, युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, श्रीकांत कदम यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.