• २७ दुचाकींसह १८ लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

संकेश्वर : संकेश्वरसह बेळगाव शहर आणि चंदगड परिसरात घडलेल्या दुचाकी चोरीच्या मालिकेचा पर्दाफाश करण्यात संकेश्वर पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी दोन सराईत चोरट्यांना अटक करण्यात आली असून त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली आहे.

लक्ष्मण वीरूपाक्षी कणबर्गी (वय ३१, मूळ रा. अंकलगी, ता. गोकाक, सध्या रा. समर्थनगर, बेळगाव) व फकीरप्पा सिद्धाप्पा करीगार (वय २५, मूळ रा. हिरेहट्टी, ता. गोकाक, सध्या रा. जोळकुरळी, ता. यरगट्टी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

या प्रकरणाची सुरुवात जुगूळ (ता. कागवाड) येथील अजित अरबोळे यांच्या तक्रारीपासून झाली. त्यांची दुचाकी ३१ मार्च रोजी संकेश्वरमधून चोरीला गेल्याने त्यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत संशयितांना ताब्यात घेतले. जिल्हा पोलीस प्रमुख के. रामराजन, अतिरिक्त पोलीस प्रमुख आर. बी. बसर्गी आणि उपअधीक्षक रवी नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एस. एम. आवजी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. सखोल चौकशीत आरोपींनी संकेश्वर, बैलहोंगल तसेच बेळगाव शहरातील विविध भाग आणि कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड परिसरात दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली.

यानुसार पोलिसांनी आरोपींकडून सुमारे १८ लाख ३० हजार रुपये किमतीच्या २७ दुचाकी जप्त केल्या आहेत. यापूर्वीही या दोघांचा विविध गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचे तपासात उघड झाले आहे.दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक यु. एस. शेट्टेण्णावर, विठ्ठल नाईक, एएसआय एल. एस. खोत व इतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.