पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती पुन्हा एकदा बिघडल्याने त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. काही वेळापूर्वीच त्यांना रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्याने त्यांना अशक्तपणा जाणवत आहे. खबरदारी म्हणून त्यांना सलाईन लावण्यात येणार असून, अशक्तपणा वगळता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.

अलीकडेच ते पाच दिवस उपचार घेऊन घरी परतले होते. त्याआधी बारामती येथील निवासस्थानी असताना त्यांना खोकला आणि कफाचा त्रास जाणवू लागला होता. छातीत कंजेशनची लक्षणे दिसल्याने वैद्यकीय पथकाने तपासणी करून त्यांना तातडीने पुण्यात हलवले होते. उपचारानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले होते. दरम्यान, पुन्हा अशक्तपणा जाणवू लागल्याने वैद्यकीय सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांकडून लक्ष ठेवण्यात येत आहे.