बेळगाव / प्रतिनिधी

खा. इराण्णा कडाडी यांनी बुधवारी बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत सीमाप्रश्न संपला आहे असे विधान केले. या वादग्रस्त विधानाचा महाराष्ट्र एकीकरण समिती आणि युवा समितीने खरपूस समाचार घेऊन तीव्र निषेध केला आहे. तसेच सीमाप्रश्नी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून न्याय मिळेपर्यंत लढा सुरुचं राहील, असा इशाराही समिती कार्यकर्त्यांनी दिला आहे. सीमावादाबद्दल माहिती नसताना अशा फोल वक्तव्यांनी बेळगावचे वातावरण बिघडवू नये, असा सल्लाही त्यांना समिती कार्यकर्त्यांकडून देण्यात आला आहे.

मागील दाराने राज्यसभा सदस्य बनलेल्या कडाडी यांनी केलेले वक्तव्य बालिशपणाचे आहे. त्यांना येथील जनतेच्या भावना माहित नाहीत. त्यांनी जनसामान्यांमधून निवडणूक लढवून दाखवावी असे आव्हान युवा समितीचे नेते शुभम शेळके यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र – कर्नाटक बेळगाव सीमाप्रश्नासंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना ती गोष्ट वेगळी आहे, असे कडाडी म्हणाले. बेळगाव जिल्ह्यात सध्या प्रशासकीय कारभारात इतकी समस्या निर्माण झाली आहे की तिचे निवारण होण्यासाठी आणि प्रशासकीय व्यवस्था चांगली राहण्यासाठी नव्या जिल्ह्यांच्या घोषणेची आवश्यकता आहे असे सांगून भाषिक अल्पसंख्यांकांच्या हक्कासंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला राज्यसभा सदस्य इराणा कडाडी यांनी उत्तर देण्याचे टाळले. तसेच हा प्रश्न संपला आहे असे विधान केले होते.

गेली ६० वर्षे मराठी भाषिक आपला महाराष्ट्र राज्यात समावेश व्हावा म्हणून सातत्याने लढा देत आहेत. अनेकांनी प्राणांची आहुती दिली आहे. भाषावार प्रांतरचना बेळगावच्या जनतेने केली नाही, ती भारत सरकारने केली आहे. आजही हा वाद न्यायालयात प्रलंबित आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष आहेत. आता त्याच पक्षाचे राज्यसभा सदस्य अशा प्रकारची विधानं करत असतील, तर भाजप नेतृत्वाने आपल्या खासदाराला समज द्यावी, अशी प्रतिक्रिया समिती कार्यकर्ते सूरज कणबरकर यांनी दिली आहे.