• प्रवाशांचे हाल कायम

नवी दिल्ली : देशातील सर्वांत मोठी विमान कंपनी ‘इंडिगो’ सध्या मोठ्या विस्कळीतपणाचा सामना करत असून, मंगळवारपासून एक हजारांपेक्षा अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. अनेक उड्डाणांना मोठ्या प्रमाणात विलंबही झाला असून, प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

गुरुवारी दिल्ली, मुंबई, बंगळूरूसह प्रमुख विमानतळांवरून ५५० पेक्षा अधिक देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द झाली. शुक्रवारी देखील परिस्थिती गंभीरच राहिली आणि सुमारे ५०० उड्डाणे रद्द करण्यात आली. विशेष म्हणजे, दिल्लीहून इंडिगोचे एकही विमान हवेत झेपावले नाही.

इंडिगोकडून जारी केलेल्या निवेदनात कंपनीने प्रवाशांची माफी मागितली असून, रद्द झालेल्या उड्डाणांसाठी प्रवाशांना संपूर्ण परतावा मिळणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

फ्लाईट ड्युटी टाइम लिमिटेशन्स नियमांच्या दुसऱ्या टप्प्यातील अंमलबजावणीमुळे वैमानिक व इतर कर्मचाऱ्यांची उपलब्धता कमी झाली. त्यामुळेच विमानसेवेवर परिणाम झाल्याचे इंडिगोने सांगितले.

या पार्श्वभूमीवर नागरी विमान वाहतूक मंत्री के. राममोहन नायडू, डीजीसीए अधिकारी आणि इंडिगो व्यवस्थापन यांच्यात गुरुवारी बैठक झाली. त्यानंतर डीजीसीएने या नियमांची अंमलबजावणी तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

नायडू म्हणाले, “उपाययोजनांमुळे तीन दिवसांत परिस्थिती पूर्ववत होईल.” तसेच, मागील चार दिवसांपासून निर्माण झालेल्या गोंधळाची चौकशी करून उत्तरदायित्व निश्चित करण्यासाठी विशेष समिती स्थापन केली असल्याचे त्यांनी सांगितले.