• प्रशासकीय पाहणीसह कायदा आणि सुव्यवस्थेचा घेतला आढावा

खानापूर / प्रतिनिधी

बेळगाव जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी खानापूर तालुक्यातील नंदगड पोलीस ठाण्यास भेट देऊन प्रशासकीय कामकाजाची सविस्तर पाहणी केली.

पोलीस ठाण्यावर आगमन होताच नंदगडचे पोलीस निरीक्षक रविकुमार धर्मट्टी यांनी त्यांचे स्वागत केले. स्वागत स्वीकारल्यानंतर एसपी रामराजन यांनी स्थानकाच्या परिसराची, कार्यालयीन कागदपत्रांची व दैनंदिन कामकाजाची तपासणी केली. यानंतर स्थानकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन नागरिकांना तत्पर सेवा देणे, तसेच कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी दक्षतेने काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

या भेटीदरम्यान एसपींनी पोलीस स्थानकाच्या आवारात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. यावेळी बैलहोंगला विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. वीरैय्या हिरेमठ यांच्यासह अन्य वरिष्ठ व कनिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.