- युवा नेतृत्वाकडे राष्ट्रीय संघटनाची धुरा
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी बिहारचे मंत्री नितीन नबीन यांची नियुक्ती करण्यात आली असून, पक्षाच्या संसदीय मंडळाच्या या निर्णयाची रविवारी अधिकृत घोषणा करण्यात आली. नितीन नबीन हे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची जागा घेणार असून, सध्या तरी पक्षाच्या संघटनात्मक प्रमुखपदाची जबाबदारी त्यांच्याकडे राहणार आहे.
भाजपची राष्ट्रीय अध्यक्षपदाची औपचारिक निवडणूक अद्याप झालेली नसली, तरी भविष्यात नितीन नबीन यांच्याकडेच अध्यक्षपदाची संपूर्ण सूत्रे दिली जाऊ शकतात, असा कयास राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या नियुक्तीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
पाटणा येथील बंकिपूर विधानसभा मतदारसंघातून नितीन नबीन २०१० पासून सातत्याने आमदार म्हणून निवडून येत आहेत. सध्या ते बिहारमध्ये नितीशकुमार यांच्या सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागासारखे महत्त्वाचे खाते सांभाळत आहेत. यापूर्वी त्यांनी भाजपच्या युवा मोर्चामध्ये काम केले असून, चंदिगडमध्ये संघटनात्मक जबाबदारीही पार पाडली आहे.
तथापि, केंद्रीय पातळीवरील कार्यकारिणी समितीतील अनुभव मर्यादित असतानाही त्यांची थेट कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने अनेकांना आश्चर्य वाटत आहे. बिहारमधील उच्चवर्णीय कायस्थ समाजातून आलेले नितीन नबीन यांच्याकडे पक्षाने दाखवलेला विश्वास हा भाजपच्या युवा नेतृत्वाला संधी देण्याच्या धोरणाचा भाग मानला जात आहे.








