- १८ तोळे दागिने चोरले ; तिजोरीतील लॉकरचं पळविला
- सीसीटीव्हीत चोरटे कैद
निपाणी / प्रतिनिधी
शहराच्या पश्चिमेस असलेल्या बिरोबा माळ भागात सोमवार (दि.१) भरदुपारी चोरी झाली. चोरट्यांनी तिजोरी फोडून त्यातील लॉकर घेऊनच पलायन केले आहे. त्यामध्ये १८ तोळे दागिने व १५०० रुपये रोख रकमेवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार बिरोबानगर मुख्य रस्त्यावर सुनील वडगावे (मूळगाव यरनाळ, सध्या रा. बिरोबा माळ) हे सोमवार (दि. १) सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास पत्नीसह दुचाकीवरून बँकेच्या कामासाठी अशोकनगर परिसरात गेले होते. दुपारी १२.१० वा. घराला कुलूप असल्याने ते तोडून चोरटे घरात शिरल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी वडगावे यांना दिली. चोरट्यांनी संबंधित घराची रेकी केल्याचे दिसून येते. वडगावे घरी परतल्यानंतर तिजोरी फोडून त्यातील लॉकर चोरट्यांनी घेऊन पलायन केल्याचे लक्षात आले. घटनास्थळी पोलिसांनी भेट दिली असून ठसेतज्ञ, श्वानपथकाला पाचारण केले आहे.
घटनेची माहिती मिळताच मंडल पोलीस निरीक्षक बी. एस. तळवार शहर पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक एस. एस. कार्जोळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील तपास चालविला आहे.
- शेजाऱ्यांना दाखवला चाकूचा धाक :
सुनील वडगावे हे कुटुंबीयांसमवेत बाहेर गेल्याचे पाहिल्यानंतर तेथेच पाळतीवर असलेल्या दोघा चोरट्यांनी गेटवरून उड्या मारून घरात प्रवेश मिळविला. यावेळी रस्त्यावरून जात असलेल्या व्यापारी घोडके यांच्या निदर्शनास ही घटना आली. त्यांनी तात्काळ आरडा-ओरड करून नागरिकांना जमविण्याचा प्रयत्न केला. यावेळी चोरट्यांनी आपण पकडले जाऊ या भीतीने चाकूचा धाक दाखवून पलायन केले. चोरटे तेथून जाताना येथील सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहेत.








