- रामदुर्ग तालुक्यातील धक्कादायक घटना
रामदुर्ग / वार्ताहर
रामदुर्ग तालुक्यातील हिरेमलंगी गावात एक धक्कादायक घटना घडली असून, तीन दिवसांच्या नवजात मुलीचा तिच्या स्वतःच्या आईने गळा दाबून जीव घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अश्विनी हळकट्टी (वय २८) असे त्या निर्दयी मातेचे नाव आहे.
याबाबत घटना स्थळावरून प्राप्त माहिती अशी की, अश्विनी हिला यापूर्वी सलग तीन मुली झाल्या होत्या, त्यामुळे ती मुलाच्या प्रतिक्षेत होती. २३ नोव्हेंबर रोजी तिची मुदकवी प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूती झाली. बालिका जन्मल्यावर दुसऱ्याच दिवशी ती आपल्या माहेरी हिरेमलंगी येथे आली होती.
मंगळवारी सकाळी घरातील लोक बाहेर गेल्याची संधी पाहून अश्विनीने नवजात बालिकेचा गळा दाबला आणि मुलगी श्वास घेत नाही असा बनाव रचला. नंतर तिने बाळाला रामदुर्ग सरकारी रुग्णालयात आणले. रामदुर्गचे टीएचओ नवीन निजगुली यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टरांनी तपासणी केली असता मृत्यू हा श्वास गुदमरल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले. शवविच्छेदन अहवालातही गळा दाबल्याचे निशाण असल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी संशयित आईविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू झाली असून रामदुर्गचे डीवायएसपी चिदंबर मडिवाळर यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. ही घटना सुरेबान पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडली आहे.








