• आरोपी टेम्पोचालक पोलिसांच्या ताब्यात

रामनगर : तीनईघाट येथे सापडलेल्या नंदगड (ता. खानापूर) येथील अंगणवाडी सेविका अश्विनी बाबुराव पाटील (वय ५०, रा. दुर्गानगर, नंदगड, ता. खानापूर) यांच्या खुनाचा उलगडा झाला असून, या प्रकरणात टेम्पो चालक शंकर पाटील (वय ३५) याला रामनगर पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, दि. २ ऑक्टोबर रोजी शंकर पाटील याने आपल्या टेम्पोमधून अश्विनी पाटील यांना कक्केरी येथे जत्रेला नेले होते. जत्रा आटोपल्यानंतर परतताना त्याने त्या “बीडी येथे सोडले” असा दावा पोलिसांसमोर केला होता. त्यावेळी नंदगड पोलिसांनी चौकशी करून त्याला सोडून दिले होते. मात्र, काही दिवसांनी अश्विनी पाटील यांचा मृतदेह तीनईघाट येथील पुलाखालील पाण्यात आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती.

घटनेनंतर शंकर पाटील फरार झाला होता. त्याच्या शोधासाठी रामनगर पोलिसांनी विशेष पथक तयार करून मोहीम सुरू केली. अखेर केवळ २४ तासांच्या आत पोलिसांनी त्याला नंदगड येथे अटक केली.

अश्विनी पाटील यांच्या खुनामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, शंकर पाटीलच या गुन्ह्याचा सूत्रधार असल्याचा पोलिसांना संशय आहे. सध्या तो रामनगर पोलिसांच्या ताब्यात असून, त्याची सखोल चौकशी सुरू आहे. या प्रकरणाचा पूर्ण उलगडा लवकरच होईल, असा विश्वास पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.