- कारला चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले ; बस झाडावर आदळली
खानापूर / प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील नंदगड येथे केएसआरटीसी बसचा अपघात होऊन ११ प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली आहे. नंदगड येथील सरकारी रुग्णालयासमोर हा अपघात घडला असून जखमी प्रवाशांना तातडीने उपचारासाठी बेळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, केएसआरटीसीची (KA-22 F 2103) ही बस नंदगडमार्गे प्रवास करत होती. बस सरकारी रुग्णालयाजवळ पोहोचत असताना अचानक रस्ता ओलांडणाऱ्या कारला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे बस रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन जोरात आदळली. अपघात इतका अचानक झाला की बसमधील अनेक प्रवासी जखमी झाले, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
या अपघातात ज्योती तहसीलदार (वय २०), श्रेयस मदार (वय १७), मेहबूबी सनदी (वय ६०), अन्नपूर्णा हुडेदार (वय ३६), सुनीता कडाबी (वय २७), मंजुळा हुडेदार (वय २८), पवित्रा हुडेदार (वय २८), शिवानी आंबेवाडकर (वय ३७) आणि शीला मिटगार (वय ३५) यांच्यासह एकूण ११ प्रवासी जखमी झाले आहेत. दरम्यान, अपघाताला कारणीभूत ठरलेल्या कारचा चालक घटनास्थळावरून पसार झाला असून या प्रकरणी नंदगड पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.








