- चार आरोपी गजाआड ; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त
खानापूर / प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील नंदगड पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडलेल्या जुन्या ट्रक टायर्स चोरीच्या गुन्ह्याचा नंदगड पोलिसांनी यशस्वीपणे तपास केला असून, या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी चोरीसाठी वापरलेली दोन मालवाहू वाहने आणि लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नंदगड येथील तौफिक अहमद इमामसाब मुजावर यांच्या पंचर दुकानाच्या मागील बाजूस ठेवण्यात आलेल्या ५५ जुन्या ट्रक टायर्सपैकी ४५ टायर्स चोरीला गेल्याची घटना घडली होती. या प्रकरणी तक्रार दाखल होताच नंदगड पोलिसांनी तपास सुरू केला.
तपासा दरम्यान रविकुमार तिगडी हिरेमठ, लक्ष्मण भजंत्री, रायप्पा भजंत्री आणि निंगप्पा भजंत्री या चार आरोपींना अटक करण्यात आली. पोलिसांनी चोरीसाठी वापरलेली महिंद्रा बोलेरो व महिंद्रा जितो (अंदाजे किंमत सुमारे ६.५० लाख रुपये) तसेच ४८ जुने ट्रक व ट्रॅक्टर टायर्स (किंमत सुमारे २४,४०० रुपये) जप्त केले आहेत.
बैलहोंगलचे डीवायएसपी डॉ. वीरैया हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली, नंदगड पोलीस निरीक्षक रविकुमार धर्मट्टी यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत एएसआय श्रीनिवास, एएसआय एस. बी. बल्लारी, हवालदार एन. ए. चंदरगी व यू. बी. शिंत्री यांचा समावेश होता. या यशस्वी कामगिरीबद्दल बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकांनी नंदगड पोलीस पथकाचे कौतुक केले आहे.








