• दोन कामगारांचा जागीच मृत्यू ; आठ जण गंभीर जखमी

बैलहोंगल / वार्ताहर

बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यात मुरकुंबी येथील इनामदार साखर कारखान्यात आज दुपारी भीषण बॉयलर स्फोट होऊन मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला असून आठ कामगार गंभीररीत्या होरपळले आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

मुरकुंबी येथील विक्रम इनामदार यांच्या मालकीच्या साखर कारखान्यात दुपारी सुमारे २ वाजता काम सुरू असताना अचानक बॉयलरचा जोरदार स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता इतकी प्रचंड होती की बॉयलरमधील उकळते पदार्थ कामगारांच्या अंगावर पडले आणि ते गंभीररीत्या होरपळले. या घटनेनंतर कारखाना परिसरात एकच गोंधळ उडाला असून स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

घटनेची माहिती मिळताच बेळगावचे जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी तातडीने रुग्णालयाला भेट देऊन जखमींची विचारपूस केली. जखमी आठ कामगारांपैकी एकाला बैलहोंगल येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, प्रकृती अत्यंत गंभीर असलेल्या सहा जखमींना ‘झिरो ट्रॅफिक’ व्यवस्थेच्या मदतीने बेळगावमधील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

या दुर्घटनेप्रकरणी मुरगोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. बॉयलर स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून तांत्रिक तपासानंतरच वस्तुस्थिती समोर येईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. घटनेनंतर कारखाना परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.