खानापूर / प्रतिनिधी

देशासाठी प्राणार्पण करणारे क्रांतीवीर संगोळी रायण्णा यांच्या नंदगड येथील पवित्र भूमीवर उभारण्यात आलेली ‘वीरभूमी’ जनतेला समर्पित करून कर्नाटक सरकारने देशभरात गौरवास्पद कार्य केले आहे, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले.

नंदगड येथे क्रांतीवीर संगोळी रायण्णा संग्रहालय (वीरभूमी) उद्घाटन, समाधीस्थळाजवळील तलावात संगोळी रायण्णा यांच्या पुतळ्याचे लोकार्पण तसेच विविध विकासकामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी बोलताना मंत्री हेब्बाळकर म्हणाल्या की, संगोळी रायण्णा म्हणजे धाडस, आत्मविश्वास आणि देशप्रेमाचे प्रतीक आहेत. त्यांच्या नावाचा उल्लेख होताच प्रत्येकामध्ये उत्साह संचारतो. वयाच्या अवघ्या ३३ व्या वर्षी अशा क्रांतिकारी नायकाला फाशी देण्यात आली, हे देशाच्या इतिहासातील वेदनादायी पर्व आहे. आधुनिक काळात स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिलेल्या नायकांना प्रकाशात आणणे ही काळाची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ‘गृहलक्ष्मी’ योजनेअंतर्गत जाहीर करण्यात आलेले दोन महिन्यांचे अनुदान लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल, अशी माहिती दिली. सरकार विकासकामांवर भर देत असून सामाजिक सलोखा राखण्याची भूमिका कायम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमाला कागिनेले येथील कनकगुरु पीठाचे डॉ.निरंजनानंद पुरी महास्वामी, जिल्हा प्रभारी मंत्री सतीश जारकीहोळी, मंत्री बैरथी सुरेश, शिवराज तंगडगी, विधानसभेचे मुख्य प्रतोद अशोक पट्टण, कर्नाटक वित्तीय महामंडळाचे अध्यक्ष व आमदार महांतेश कौजलगी, राज्य हमी योजना अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष एच. एम. रेवण्णा, आमदार विठ्ठल हलगेकर, बाबासाहेब पाटील, विश्वास वैद्य, गणेश हुक्केरी, महेंद्र थम्मण्णावर, विधानपरिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, माजी आमदार अंजली निंबाळकर, अरविंद पाटील, बडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.