• एक संशयित ताब्यात ; दुसरा फरार

खानापूर / प्रतिनिधी

मोलेम  येथील तपासणी नाक्यावर शनिवारी रात्री अंदाजे ९. १५ वा. गोव्याच्या दिशेने जाणारी बेकायदेशीर गोमांस वाहतूक करणारी टाटा झायलो कार पोलिसांनी ताब्यात घेतली. वाहनातून मोठ्या प्रमाणात गोमांस आढळून आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या करवाईत एक संशयित व्यक्ती पोलिसांच्या हाती लागला असून दुसरा आरोपी फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, जीए ०७ ई १५८२ क्रमांकाची झायलो गोव्याच्या दिशेने जात असताना तपासणी नाक्यावर तैनात कर्मचार्‍यांना वाहन संशयास्पद वाटले. त्यानंतर कारची तपासणी केली असता आत मोठ्या प्रमाणात गोमांस साठवलेले आढळले. वाहन आणि अटक केलेला संशयित यांना तात्काळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच मोलेम परिसरातील हिंदुत्ववादी व बजरंग दलाचे कार्यकर्ते तपासणी नाक्यावर मोठ्या संख्येने एकत्र आले. पोलिसांसह तपासणी नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी मिळून फरार आरोपीचा शोध मोहीम हाती घेतली; मात्र रात्री उशिरापर्यंत तो सापडला नाही. या प्रकरणाचा पुढील तपास मोलेम (गोवा) पोलीस करीत असून फरार आरोपीला पकडण्यासाठी शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे.