• बैलहोंगल तालुक्यातील घटना

बैलहोंगल / वार्ताहर

बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील अनिगोळ गावात मायक्रोफायनान्स कर्जाच्या छळाला कंटाळून एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.आत्महत्ये पूर्वी तिने घराच्या भिंतीवर डेथनोट लिहल्याची माहिती प्राप्त झाली आहे. भिंतीवर लिहिलेल्या या डेथनोटमुळे या प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले आहे. डेथनोटमध्ये तिने काही व्यक्तींना आपल्या मृत्यूस जबाबदार धरल्याचे समजते.

आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव गौरव्वा निलप्पा केंगानूर (वय ३६) असे आहे. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी विविध मायक्रोफायनान्स संस्थांकडून सुमारे ७ ते १० लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र कर्जफेडीसाठी संबंधित कर्मचाऱ्यांकडून सातत्याने दबाव व त्रास होत असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. हा मानसिक ताण सहन न झाल्याने गौरवने टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती आहे.

मृत्युपत्रात तिने सुमव्वा, मंजप्पा आणि कस्तुरी यांची नावे घेत आपल्या मृत्यूसाठी जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. तसेच आपल्या मुलांच्या शिक्षण व भवितव्याबाबत शेवटची इच्छा व्यक्त केली आहे.

या प्रकरणी बैलहोंगल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरू आहे. घटनेनंतर मृताच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.