बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव शहरातील बहुप्रतिक्षित उड्डाणपुलाच्या कामाला वेग देण्यासाठी ६ जानेवारी रोजी महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली असून, या बैठकीत विविध संघटना आणि नागरिकांची मते जाणून घेण्यात येणार आहेत, अशी माहिती पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली.
मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात या संदर्भात विशेष बैठक पार पडली. राज्य मंत्रिमंडळाने उड्डाणपुलाच्या प्रकल्पाला मंजुरी दिल्यानंतर पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी शहरातील कचऱ्याची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी उत्तर व दक्षिण मतदारसंघात पर्यायी जागा शोधण्याच्या सूचना त्यांनी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आणि महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या.
राज्य सरकारने या उड्डाणपुलासाठी २७० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हा पूल राष्ट्रीय महामार्गापासून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकापर्यंत उभारण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात राष्ट्रीय महामार्ग ते राणी चन्नम्मा चौक, दुसऱ्या टप्प्यात राणी चन्नम्मा चौक ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक आणि तिसऱ्या टप्प्यात थर्ड रेल्वे गेटपर्यंत पुलाची उभारणी करण्यात येणार आहे. ६ जानेवारीच्या बैठकीत सर्वांचे मत विचारात घेऊन पुढील निर्णय घेतले जातील, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, शहरातील तुरमुरी कचरा डेपोवरील ताण कमी करण्यासाठी पर्यायी जागा निश्चित करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. योग्य जागा उपलब्ध झाल्यानंतर तेथे शास्त्रीय पद्धतीने कचरा विल्हेवाट प्रकल्प उभारण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. बैठकीत स्मार्ट सिटी, बुडा आणि हेस्कॉम विभागातील प्रलंबित विकासकामांचाही आढावा घेण्यात आला. पूर्ण झालेली कामे संबंधित विभागांकडे तातडीने हस्तांतरित करण्याचे निर्देश देण्यात आले.
या बैठकीला आमदार राजू सेठ, पोलीस आयुक्त भूषण बोरसे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे आणि प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी डॉ. भानुदास प्रकाश उपस्थित होते.








