• २५ जणांचा मृत्यू

पणजी / प्रतिनिधी

गोवा राज्यात रविवारी मध्यरात्री मोठी दुर्घटना घडली. हडफडे (अर्पोरा) येथील ‘बर्च बाय रोमिओ लेन’ या प्रसिद्ध रेस्टॉरंट-कम-नाईटक्लबमध्ये लागलेल्या भीषण आगीत तब्बल २५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मध्यरात्री साधारण १ वाजण्याच्या सुमारास घडली.

आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस अधिकारी आणि बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतांमध्ये २३ जणांचा गुदमरून, तर दोघांचा होरपळून मृत्यू झाला आहे. एकूण २५ मृतांमध्ये तीन महिलांसह बहुतेक क्लब कर्मचारी होते, ज्यात किचनमधील कामगारांची संख्या अधिक आहे. तसेच, मृतांमध्ये चार पर्यटकांचा देखील समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आमदार मायकल लोबो आणि पोलीस महासंचालक आलोक कुमार यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. प्राथमिक तपासानुसार क्लबच्या किचनजवळ गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन आग भडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री सावंत यांनी दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दुख: व्यक्त करत मृतांच्या कुटुंबियांना २ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे.

या दुर्घटनेत जखमी झालेल्या सहा जणांवर गोमेकॉ रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी बांबोळी येथील गोमेकॉमध्ये हलवण्यात आले आहेत.

पोलीस महासंचालक आलोक कुमार यांनीही, क्लबची संरचना, अग्निसुरक्षा नियमांचे पालन आणि आपत्कालीन बाहेर पडण्याच्या मार्गांची तपासणी करण्याचे निर्देश दिले असून, पोलिसांनी क्लब सील करून पुढील तपास सुरू केला आहे.