- तिघे अटकेत
कागवाड : बेळगाव जिल्ह्याच्या कागवाड तालुक्यातील मंगसूळी येथे रिक्षा उभ्या करण्याच्या रांगेवरून झालेल्या वादातून एका तरुण रिक्षाचालकाची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी तात्काळ कारवाई करत तीन संशयितांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
मृत तरुणाचे नाव अशोक वडर (वय २७, रा. मंगसूळी) असे आहे. रिक्षा थांब्यावर गाड्या लावण्याच्या क्रमावरून अशोक आणि इतर चालकांमध्ये काही दिवसांपासून वाद सुरू होते. या वादातूनच परस्परांमध्ये वैर निर्माण झाले होते.
या पार्श्वभूमीवर आरोपी शिवा वडर, सागर वडर आणि विनोद वडर यांनी अशोकवर डोक्यात प्राणघातक हल्ला करून त्याचा खून केल्याचे समोर आले आहे. दोन दिवसांपूर्वी घडलेली ही घटना उशिरा उघडकीस आली. माहिती मिळताच कागवाड पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला.
या प्रकरणी तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या या घटनेमुळे मंगसूळी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.








