• भारताने इंग्लंडच्या तोंडातला विजयाचा घास हिसकावला !

मँचेस्टर : भारत आणि इंग्लंड यांच्यात मँचेस्टरमध्ये खेळला गेलेला चौथा कसोटी सामना अनिर्णित राहिला आहे. दुसऱ्या डावात भारताने सुरुवातीला शून्यावरच दोन गडी गमावले होते. तेव्हा भारत मोठ्या फरकाने हा सामना हरणार असे वाटत होते. पण त्यानंतर तिसऱ्या विकेटसाठी के.एल. राहुल आणि शुभमन गिल यांनी १८८ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करून भारताला सावरले. त्यानंतर पाचव्या विकेटसाठी वॉशिंगटन सुंदर आणि रवींद्र जडेजा यांनीही दमदार भागीदारी करत इंग्लंडच्या विजयाच्या आशा धुळीस मिळवल्या. या खेळीमुळे सामना ड्रॉ झाला आणि इंग्लंडला मालिका जिंकण्याची संधी या सामन्यात मिळाली नाही.

  • भारताचा पहिला डावात :

मँचेस्टर कसोटीत इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीस पाचारण केले. भारताचा पहिला डाव 358 धावांत आटोपला. टीम इंडियाकडून साई सुदर्शनने 61, यशस्वी जैस्वालने 58, ऋषभ पंतने 54, के.एल.राहुलने 46, शार्दुल ठाकूरने 41 आणि वॉशिंग्टन सुंदरने 27 धावा केल्या. इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्सने भेदक मारा करत 5 बळी घेतले. जोफ्रा आर्चरने 3, तर क्रिस वोक्स आणि लियाम लिव्हिंगस्टन यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

  • इंग्लंडची तुफानी फलंदाजी, 669 धावांचा डोंगर :

उत्तरादाखल इंग्लंडने पहिल्या डावात भक्कम 669 धावा फटकावल्या आणि भारतावर 311 धावांची मोठी आघाडी घेतली. जो रूटने 150 आणि कर्णधार बेन स्टोक्सने 141 धावांची शानदार शतकी खेळी केली. झॅक क्रॉलीने 84 आणि बेन डकेटने 94 धावा केल्या. भारताकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक 4 बळी घेतले, तर जसप्रीत बुमराह आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. मोहम्मद सिराज आणि कंबोजला प्रत्येकी 1-1 यश मिळाले.

  • दुसऱ्या डावात गिल-राहुलची भागीदारी :

दुसऱ्या डावात भारताची सुरुवात अत्यंत खराब झाली. यशस्वी जैस्वाल आणि साई सुदर्शन दोघेही शून्यावर बाद झाले. मात्र नंतर शुभमन गिल आणि के. एल. राहुलने जबरदस्त झुंज दिली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 188 धावांची भागीदारी करत इंग्लंडला अडचणीत टाकलं. राहुलने 230 चेंडूत 90 धावा केल्या, तर गिलने शतकी खेळी करत 103 धावा फटकावल्या.

  • सुंदर जडेजाची भागीदारी, सामना वाचवला :

यानंतर रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदरने संयमी आणि शिस्तबद्ध फलंदाजी करत भारताला पराभवापासून वाचवले. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 200 हून अधिक धावांची अभेद्य भागीदारी केली. जडेजा 107 आणि सुंदर 101 धावा करून नाबाद राहिले. अखेर या दोघांच्या खेळीमुळे दोन्ही संघांनी सामना ड्रॉ मान्य केला.