- अथणीत धक्कादायक घटना : ऊसाच्या शेतात गळा आवळून महिलेचा खून
- पोलिस तपासाला वेग
अथणी / वार्ताहर
अथणी शहराजवळील ऊसाच्या शेतात एका महिलेचा गळा आवळून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मालमत्ता हडप करण्याच्या उद्देशाने प्रेयसीची हत्या केल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला असून या प्रकरणी तपास सुरू आहे.
सुजाता पवार (वय ३४) असे मृत महिलेचे नाव असून ५ मार्च रोजी दुपारी अथणी शहराजवळील प्रदीप गुंडा यांच्या ऊसाच्या बागेत तिचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुजाता पवार हिने हारुगेरी येथील पतीपासून वेगळे राहण्याचा निर्णय घेतला होता आणि ती सध्या अथणी येथे वास्तव्यास होती. दरम्यान, तिचे कुमार हवालदार नावाच्या व्यक्तीशी प्रेमसंबंध होते.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, आरोपी कुमार हवालदार याने सुजाता पवार हिला दुचाकीवरून ऊसाच्या शेतात नेले. तेथे तिच्या गळ्यात कापड बांधून गळा दाबत तिची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. महिलेच्या मालमत्तेवर डोळा ठेवून हा खून करण्यात आल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.
या प्रकरणी अथणी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.







