• शिवानंद महाविद्यालयात महात्मा जोतिबा फुले जयंती साजरी

कागवाड : एका वर्तुळात अडकलेले शिक्षण महात्मा फुल्यांनी सर्वांसाठी खुले करून बहुजन आणि स्त्रियांसाठी ज्ञानाचे दरवाजे उघडले. त्यांच्या या क्रांतिकारी कार्यामुळे आज समाजातील विविध घटकांचा शिक्षणात सहभाग वाढला असून समाज अधिक एकजिनसी बनला आहे. शिक्षणामुळेच विकास साधता येतो, ही जाणीव आज दलित, आदिवासी, भटके आणि तळागाळातील समाजघटकांमध्ये निर्माण झाली आहे. तळातून झालेली राजकीय घुसळण, धर्मसत्तेला दिले गेलेले आव्हान आणि शेतकरी आंदोलनांचा उदय हे सर्व फुल्यांच्या विचारांवर आधारलेले परिवर्तनाचे टप्पे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हा विचार पुन्हा एकदा जनमानसात रुजविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा. बी. डी. दामन्नवर यांनी केले.

येथील शिवानंद महाविद्यालयातील मराठी विभागातर्फे महात्मा जोतिबा फुले यांच्या द्वीशताब्दी जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात प्रा. दामन्नवर हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

प्रारंभी महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक करताना मराठी विभाग प्रमुख प्रा. अशोक आलगोंडी फुल्यांच्या कार्याचा आढावा घेतला. अत्यंत प्रतिकूल रिस्थितीतही फुल्यांनी शिक्षण घेऊन समतेचा, सत्यशोधाचा, स्त्री सन्मानाचा आणि शिक्षणाचा वस्तुपाठ घालून दिला. स्त्री-पुरुष समानता हा फुलेंच्या विचाराचा केंद्रीभूत मुद्दा आहे. ज्योतिबांनी सामाजिक-धार्मिक रितीरिवाजांसह कुटुंबपद्धतीची पुनर्रचना करण्याचे ठरवले. सुरुवातीला फुले यांनी पर्यायी विवाहपद्धतीविषयी विचार करायला सुरुवात केली व सत्यशोधक विवाहपद्धती मांडली. असे ते म्हणाले.

यावेळी मराठी विभागाच्या वतीने महात्मा फुलेंच्या द्वीशताब्दी जयंती वर्षानिमित्त वर्षभर विविध उपक्रम, व्याख्यान आयोजित करण्याचा संकल्प केला गेला. कार्यक्रमाला हिंदी विभाग प्रमुख डॉ. अमोल पाटील यांच्यासह मराठी विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.