- कोलंबोतील महामुकाबल्यात पाकिस्तानचा ६१ धावांनी पराभव
- टीम इंडियाची सुपर-८ मध्ये धडक
कोलंबो – महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर टीम इंडियाने विजयाचा ‘अभिषेक’ करत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर ६१ धावांनी दणदणीत मात केली. आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक स्पर्धेतील या लढतीत भारताने सलग तिसरा विजय नोंदवत सुपर-८ फेरीतील स्थान जवळपास निश्चित केले.
- पाकिस्तानचा पाठलाग कोलमडला :
१७६ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या पाकिस्तानची सुरुवात अत्यंत खराब झाली. हार्दिक पंड्याने पहिल्याच षटकात साहिबजाहा फरहानला बाद केले. जसप्रीत बुमराहच्या भेदक यॉर्करसमोर सईम अयुब अपयशीठरला, तर सलमान अली अघाही फटकेबाजीच्या नादात बाद झाला. पॉवरप्लेमध्येच तीन प्रमुख फलंदाज बाद झाल्याने पाकिस्तानचा डाव ढासळला.
बाबर आझमने डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र अक्षर पटेलने त्याला त्रिफळाचीत केले. उस्मान खानने ४४ धावांची एकाकी झुंज दिली; पण इतर फलंदाजांनी साथ न दिल्याने पाकिस्तानचा डाव ११४ धावांतच संपुष्टात आला. भारताकडून हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
- भारताचा डाव ; इशानची आक्रमक खेळी :
प्रारंभी, कोलंबोतील प्रमदासा स्टेडियममध्ये पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार सलमान अली अघाने पहिल्याच षटकात फिरकीचा वापर करत अभिषेक शर्माला बाद केले. सुरुवातीला भारतावर दबाव निर्माण झाला असला तरी इशान किशनने आक्रमक फलंदाजी करत डाव सावरला.
इशानने ४० चेंडूत १० चौकार आणि ३ षटकारांसह ७७ धावांची दमदार खेळी केली आणि भारताच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. तिलक वर्मा (२५) आणि सूर्यकुमार यादव (३२) यांनी उपयुक्त धावा केल्या. हार्दिक पंड्या धावसंख्या न वाढवता बाद झाला ; मात्र शिवम दुबेने १७ चेंडूत २७ धावांचे योगदान दिले. भारताने निर्धारित २० षटकांत १७५ धावा केल्या. पाकिस्तानकडून सईम अयुबने तीन विकेट्स घेतल्या.
या विजयामुळे भारताचे तीनपैकी तीन सामने जिंकून गुणतालिकेत स्थान भक्कम झाले आहे. दुसरीकडे पाकिस्तानसमोर बाद फेरीत प्रवेशासाठी मोठे आव्हान उभे राहिले आहे.







