खानापूर / प्रतिनिधी
मराठी शाळात विद्यार्थ्यांची संख्या वाढावी यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून घेत प्रयत्न करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य रमेश धबाले यांनी केले आहे.
चापगाव ग्राम पंचायतीच्या अखत्यारीत येणाऱ्या विविध गावातील सरकारी मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी धबाले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मराठी संस्कृती व मराठी शाळा टिकविण्यासाठी नेहमीच पुढाकार घेणाऱ्या युवा समितीचे कार्य कौतुकास्पद आहे असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एसडीएमसी अध्यक्ष मष्णू चोपडे होते. यावेळी एसडीएमसी सदस्य अभिजीत पाटील, प्रभू कदम, परसू कदम आदी उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक महेश कवळेकर यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. शिवोली व कारलगा येथील सरकारी मराठी शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.