बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव महानगरपालिकेच्या सभेत मराठी नगरसेवकांना मराठी भाषेसाठी आवाज उठवण्यापासून रोखण्यात आले. सभेला सुरुवात होण्यापूर्वी मराठी भाषेला योग्य सन्मान मिळावा, यासाठी त्यांनी आपला मुद्दा मांडला. मात्र त्यांना सभागृहात बोलण्याची परवानगीही देण्यात आली नाही. ही खऱ्या अर्थाने सभागृहातील लोकशाहीची हत्या असून, या घटनेचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो, असे महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी म्हटले आहे.

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय पक्षांतील लोकप्रतिनिधींना आपली बाजू नम्रपणे समजावून सांगण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत मराठी भाषेला योग्य स्थान मिळावे आणि सरकारी परिपत्रके मराठी भाषेत असावीत, अशी आमची मागणी आहे. मात्र, मराठी नगरसेवकांना बोलू दिले गेले नाही. केवळ मातृभाषेसाठी केलेल्या मागणीवरून काही नगरसेवकांनी त्यांना सभागृहाबाहेर काढून टाकण्याची भाषा केली. अशा लोकांचा माज उतरवण्याची गरज आहे. लोकशाहीच्या मार्गाने लढा देणाऱ्या मराठी भाषिकांसोबतचा हा व्यवहार सहन केला जाणार नाही, ही बाब राष्ट्रीय पक्षांतील मराठी भाषिक लोकप्रतिनिधींनीही लक्षात घ्यावी. मराठीला सन्मान देण्याची नम्र मागणी करूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. मराठी भाषेची अशा पद्धतीने केलेली गळचेपी ही आपल्यासाठी शोकांतिका आहे, असेही शेळके यांनी नमूद केले.

यासाठी सर्व लोकप्रतिनिधींना मराठी भाषेच्या संदर्भात निवेदने देण्यात येत आहेत. आज महानगरपालिकेत आवाज उठवणाऱ्या मराठी शिलेदारांना शुभम शेळके यांनी सलाम केला. राष्ट्रीय पक्षांतील लोकप्रतिनिधींना एकच निरोप आहे की, मराठी भाषेचे फलक, सरकारी कार्यालये आणि इतर ठिकाणाहून पुसून टाकण्याचा आपण कितीही प्रयत्न केला, तरी लाखो मराठी भाषिक जनतेच्या मनातून ही मराठी भाषा कधीच पुसली जाणार नाही. राष्ट्रीय पक्षांतील सर्व मराठी भाषिक कार्यकर्ते, नेते आणि पदाधिकाऱ्यांनी भविष्यातील मराठी भाषेवरील संकटे लक्षात घेऊन पक्ष, संघटना बाजूला ठेवून मराठी भाषेसाठी एकत्र येण्याचे आवाहनही शेळके यांनी केले.