- चोरटे रिकाम्या हाताने परतले : जनता कॉलनीतील घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश
- पोलिसांचा तपास सुरू
खानापूर / प्रतिनिधी
लोंढा येथील जनता कॉलनी परिसरात भरदिवसा घरफोडीचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे. अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला ; मात्र कोणतीही मौल्यवान वस्तू हाती न लागल्याने ते रिकाम्या हाताने पसार झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, जनता कॉलनीतील रहिवासी भारती सुनील गांगेकर यांच्या घराच्या मागील बाजूचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरात शिरल्यानंतर त्यांनी तिजोरीची मोडतोड केली तसेच गादी, कपडे आणि इतर साहित्य अस्ताव्यस्त करून टाकले. मात्र घरात कोणतीही मौल्यवान वस्तू न सापडल्याने चोरट्यांनी तेथून काढता पाय घेतल्याचे समजते.
घटनेची माहिती मिळताच माजी जिल्हा परिषद सदस्य बाबुराव देसाई यांनी तातडीने लोंढा आऊटपोस्ट पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहावे आणि परिसरात संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.








