लोंढा : लोंढा रेल्वे फाट्याजवळ शुक्रवारी रात्री घडलेल्या भीषण रस्ते अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला. नाऊ बाबू खरात (वय २३, रा. गवळीवाडा, वरकड) असे मृत तरुणाचे नाव आहे. मृत नाऊ खरातच्या पश्चात आई-वडील, लहान भाऊ व बहीण असा परिवार आहे.

याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, रस्त्याच्या कामासाठी ठेवण्यात आलेल्या सिमेंटच्या बॅरिकेड्सला दुचाकीने जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. नाऊ खरात हा शुक्रवारी मावशीच्या घरी गेला होता. रात्री सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास लोंढा रेल्वे गेटजवळ त्याची दुचाकी रस्त्याच्या कडेला ठेवलेल्या सिमेंट बॅरिकेड्सवर आदळली. धडक इतकी तीव्र होती की दोन बॅरिकेड्सच्या मधोमध तो अडकला आणि गंभीर दुखापतीमुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच लोंढा ओपीचे विवेक वडे, एफ. मुल्ला व प्रवीण करंबळकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. खानापूरचे पोलीस निरीक्षक लाडसाब गौंडी यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. शनिवारी सकाळी मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आली. अपघाताच्या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.