• विश्वशांती बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, भारत, संस्थेतर्फे पणजीत हृद्य कार्यक्रम
  • देशभरातील दहा मान्यवरांचा पुरस्कार प्रदान करून सत्कार
  • सत्कारमूर्तीमध्ये गोव्यातील पाच जणांचा समावेश
  • गोमंतकीय साहित्यिकांच्या लेखनावरील तीन पुस्तकांचे प्रकाशन
  • कविसंमेलनात गोव्यातील प्रतिभावंत कवींचा सहभाग
  • सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांचीही उपस्थिती
  • विश्वशांती बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, भारत, संस्थेतर्फे पणजीत हृद्य कार्यक्रम
  • देशभरातील दहा मान्यवरांचा पुरस्कार प्रदान करून सत्कार
  • सत्कारमूर्तीमध्ये गोव्यातील पाच जणांचा समावेश
  • गोमंतकीय साहित्यिकांच्या लेखनावरील तीन पुस्तकांचे प्रकाशन
  • कविसंमेलनात गोव्यातील प्रतिभावंत कवींचा सहभाग
  • सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांचीही उपस्थिती

पणजी : ‘‘समाजाच्या भल्यासाठी, आपण समाजाचे देणे लागतो, हा विचार समोर ठेवून विधायक कार्याच्या आधारे आपण कार्यरत राहायला हवे. देशात विधायक कार्यासाठी केवळ राजकीय पक्षच नव्हे, तर सर्वसामान्य जनतेनेही सहभाग घ्यायला हवा, तरच समाजाचा विकास शक्य आहे. लोकसहभाग असल्याशिवाय सामाजिक प्रगती किंवा विकास हा अशक्य असतो’’, असे प्रतिपादन केंद्र सरकारच्या नव तथा अक्षय ऊर्जा मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री तथा उत्तर गोवा खासदार श्रीपाद नाईक यांनी काढले.

पुणे येथून कार्यरत असलेल्या ‘विश्वशांती बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, भारत’तर्फे इन्स्टिट्‍युट मिनेझीस ब्रागांझाच्या संयुक्त विद्यमाने पणजी येथील आय.एम.बी. सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या हृद्य कार्यक्रमात विश्वशांती पुरस्कार प्रदान करून देशभरातील दहा मान्यवरांचा सत्कार झाला. सत्कारमूर्तीमध्ये गोव्यातील पाच जणांचा समावेश होता. यावेळी गोमंतकीय साहित्यिकांच्या लेखनावरील तीन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. कविसंमेलनात गोव्यातील प्रतिभावंत कवींचा चांगल्यापैकी प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाला सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांचीही उपस्थिती लाभली होती.

या कार्यक्रमात ‘कोकण मराठी परिषद, गोवाचे अध्यक्ष सुदेश आर्लेकर यांना विश्वशांती साहित्य गौरव पुरस्कार, साहित्यिक तथा उद्योजक गुरुदास नाटेकर यांना विश्वशांती साहित्य गौरव पुरस्कार, गोव्यातील चित्रपट अभिनेते तथा नाट्यदिग्दर्शक नितीन कोलवेकर यांना विश्वशांती कला गौरव पुरस्कार, समाजसेविका खतिजा खान यांना आदर्श महिला पुरस्कार, तर पांडुरंग गावकर यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच, छत्तीसगड येथील सुनीता रहाटे यांना समाजरत्न पुरस्कार, छत्रपती संभाजीनगर येथील कृष्णा गुंड यांना राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार, निशांत निटवे यांना समाजरत्न पुरस्कार, विलास माळी यांना कृषिरत्न पुरस्कार, तर दत्तात्रय कांबळे यांना शिक्षकरत्न पुरस्कार देण्यात आला.

व्यासपीठावर उद्घाटन सत्रात प्रमुख पाहुणे गोवा स्वातंत्र्यसेनानी संघाचे अध्यक्ष रोहिदास दाद देसाई यांच्यासह कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. एच.एल. नाईक उपस्थित होते. याशिवाय प्रख्यात गोमंतकीय शल्यचिकित्सक आणि हृदयरोगतज्ज्ञ डॉ. दिगंबर नाईक, कवी अफसर शेख, साहित्यिक गजानन देसाई, ज्येष्ठ पर्यावरणवादी कार्यकर्ते आणि लेखक राजेंद्र केरकर, ॲड. महेश राणे, समाजसेविका आणि प्राध्यापिका बिना नाईक, सरकारी वकील अॅड. एन. डी. पाटील, विनोद पोकळे, उमेश गाड, विश्वशांती बहुउद्देशीय संस्था, भारत या संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजयभाऊ चौधरी, मिनेझीस ब्रागांझा संस्थेचे सचिव अशोक परब इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. रेखा पौडवाल यांनी संपादन केलेल्या ‘पाऊस’ या कवितासंग्रहाचे, तसेच संपादन केलेल्या ‘गोमंत वैभव’ आणि ‘गोमंत लोकसंचित’ या तीन पुस्तकांचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. श्रद्धा गवंडी यांनी पुस्तकांविषयी स्वतःचे मनोगत व्यक्त केले. प्रा. गौरी नाडकर्णी यांनी तिन्ही पुस्तकांवर भाष्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवयित्री आणि शिक्षिका अक्षता किनळेकर मडगावकर यांनी केले. आभार प्रदर्शन कवयित्री आणि लेखिका डॉ. रेखा पौडवाल यांनी केले.

आपले मनोगत व्यक्त करताना मंत्री श्रीपाद नाईक पुढे म्हणाले, २०४७ पर्यंत भारताला संपूर्ण विकसित राष्ट्र बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यात सर्वांनीच हातभार लावायला हवा, असे त्यांनी मत व्यक्त केले. राज्याचे सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांनीही यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना अशा प्रकारच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकांनी एकमेकांना भेटणे आवश्यक असून, सामाजिक घटकांची सेवा होणे गरजेचे आहे, असे संगितले. कवी संमेलनाच्या माध्यमातून कवी समाजमनात वादळ निर्माण करू शकतो व त्यामुळे कविता आणि साहित्यविषयक कार्यक्रम होणे काळाची गरज आहे, असेही ते म्हणाले.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात संजयभाऊ चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कविसंमेलनावेळी व्यासपीठावर अफसर शेख, ॲड. एन. डी. पाटील, अजितसिंह राणे, व इतर मान्यवरांची उपस्थिती होती. त्या सत्राचे सूत्रसंचालन नूतन दाभोळकर यांनी केले. यावेळी विविध कवींनी कविता सादर केल्या. कविसंमेलनाचे सूत्रसंचालन नूतन दाभोळकर यांनी केले व रेखा डायस यांनी आभार मानले या कार्यक्रमांचे आयोजन श्रीसाई प्रतिष्ठाण पुणे या संस्थेच्या वतीने करण्यात आले होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. रेखा पौडवाल, सविता गिरोडकर, शोभा धामस्कर, शर्मिला प्रभू, नूतन दाभोळकर, रेखा डायस यांनी परिश्रम घेतले.