- भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू
लखनौ : लग्न सोहळा आटपून घरी परतणाऱ्या कुटुंबियांवर काळाने झडप घालत भीषण अपघात घडला. ट्रक आणि बस यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत ६ जणांचा मृत्यू झाला असून ७ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील हापूर जिल्हा येथे घडली. धौलाना-गुलावठी मार्गावर समोरून येणाऱ्या ट्रकने प्रवाशांनी भरलेल्या बसला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की बसचा अक्षरशः चुराडा झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, ही बस विवाह सोहळ्यावरून परतत होती. बसमध्ये सुमारे १२ ते १३ प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.
जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.








