• कंग्राळी बी.के.येथील सहा जण गंभीर जखमी
  • चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारची दुभाजकाला धडक

खानापूर / प्रतिनिधी

खानापूर–लोंढा महामार्गावरील कुप्पटगिरी क्रॉस येथील पुलावर रविवारी (दि. १५) सायंकाळी सुमारास झालेल्या भीषण अपघातात कंग्राळी बी.के. (ता. बेळगाव) येथील सहा जण गंभीर जखमी झाले. कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती असून या प्रकरणी खानापूर पोलीस स्थानक येथे नोंद करण्यात आली आहे.

याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, कंग्राळी बी. के. येथील काही जण केए-२२ एम ए ६६०४ क्रमांकाच्या कारने दांडेली जवळील कवळे येथील शिवमंदिरात दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून ते बेळगावकडे परत येत असताना खानापूरजवळील कुप्पटगिरी क्रॉस पुलावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण अचानक सुटले.नियंत्रण सुटताच कार प्रथम रस्त्याच्या दुभाजकावर आदळली. धडक इतकी जोराची होती की, त्यानंतर कारने तेथे उभारण्यात आलेल्या फलकावरही धडक दिली. या भीषण अपघातात नितीश हुरुडे, ओमकार पाटील, परशुराम अष्टेकर, कपिल पाटील, नागराज पाटील आणि कुणाल हेब्बाळकर (सर्व रा. कंग्राळी बी.के.) हे सहाही जण गंभीर जखमी झाले.

अपघातानंतर काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, त्याचवेळी महामार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांनी तत्परता दाखवत जखमींना कारमधून बाहेर काढले आणि तातडीने बेळगाव येथील विजय हॉस्पिटल येथे उपचारासाठी हलवले. सध्या सर्व जखमींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेचा पुढील तपास खानापूर पोलीस करत आहेत.