- दोघे गंभीर जखमी
रायबाग / वार्ताहर
रायबाग तालुक्यातील कुडची–जमखंडी मार्गावर हाल शिरगुर गावाजवळ मंगळवारी सकाळी भीषण रस्ता अपघात घडला. वळणावर नियंत्रण सुटल्याने सिमेंटने भरलेला ट्रक उलटून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोसळला. या दुर्घटनेत पाचवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच कुटुंबातील दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत.
कुडचीहून हारुगेरीकडे जाणारा सिमेंट ट्रक वळणावर पलटी झाल्याने बी. बी. बावी सरकारी हायस्कूल, हाल शिरगुर येथे जाणारे विद्यार्थी ट्रकखाली अडकले. यात अमित कांबळे (वय ११) या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच कुटुंबातील अंजली कांबळे (इयत्ता १०वी) आणि अविनाश कांबळे (इयत्ता ९वी) हे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने हारुगेरी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या साहाय्याने उलटलेला ट्रक उचलून अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून कुडची पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.








