- शासन निर्णय काढून हॉटेल कामगार कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याची मागणी
कोल्हापूर / प्रतिनिधी
हॉटेल कामगार कल्याणकारी महामंडळाचा शासन निर्णय (जीआर) काढून स्थापना व्हावी, या मागणीसाठी आज हॉटेल कामगार संघटना कोल्हापूर, यांच्यावतीने संघटनेचे संस्थापक अनिल कांबळे आणि सहकाऱ्यांनी आरोग्यमंत्री तथा कोल्हापूर जिह्वा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन निवेदन सादर केले. याप्रसंगी शासन दरबारी हॉटेल कामगारांची बाजू मांडून हॉटेल कामगार कल्याणकारी महामंडळ मंजूर करून घेतल्याबद्दल संघटनेच्यावतीने पालकमंत्र्यांचे अभिनंदन करण्यात आले.
हॉटेल कामगार कल्याणकारी महामंडळाची अंमलबजावणी होऊनही अद्याप त्याचा शासन निर्णय (जीआर) प्राप्त झालेला नाही. सध्याची परिस्थिती लक्षात घेता कोल्हापूर मतदारसंघातील नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातील हॉटेल कामगार सुरक्षित नाहीत, तेव्हा शासन निर्णय (जीआर) काढून लवकरात लवकर या महामंडळाची स्थापना करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिल कांबळे यांनी मंत्री प्रकाश आबिटकर यांना हॉटेल कामगार का दुर्लक्षित आहे हे पटवून दिले. तसेच पर्यटनाच्या दृष्टीतून महत्त्वाचा दुवा असलेल्या हॉटेल कामगाराला पाण्यात का बघितले जाते याचे ज्वलंत उदाहरण त्यांनी मंत्र्यांपुढे सादर केले.
निवेदन स्वीकारून मंत्री प्रकाश आबिटकर यांनी मागणीची पूर्तता करण्याचे आश्वासन दिल्याने संघटनेने समाधान व्यक्त केले. यावेळी संस्थापक अनिल कांबळे, कृष्णा जाधव, आकाश गावडे, दीपक पाटील, रवींद्र जाधव, महादेव कांबळे, ज्ञानेश्वर कांबळे, समर्थ क्षीरसागर, रामचंद्र पाटील, रवींद्र पाटील, अभिषेक नायर, दिलीप गावडे, सोमनाथ शिरगावकर आदी उपस्थित होते.