• अनैतिक संबंधातून हत्या झाल्याचे उघड

खानापूर / प्रतिनिधी

खानापूर शहरानजीक असलेल्या गांधीनगर येथील शनि मंदिर हनुमान मंदिर परिसरात रविवारी दुपारी घडलेल्या हत्या प्रकरणात अनैतिक संबंध असल्याचे उघडकीस आले आहे. या हत्येमध्ये सुरेश उर्फ रमेश बंडीवड्डर (मूळ गाव तेग्गूर, सध्या राहणार गांधीनगर) याचा मृत्यू झाला असून, त्याच्या पत्नीसह चौघांना पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत प्राप्त माहितीनुसार, मयत सुरेश याची पत्नी स्नेहा हिचे यशवंत उर्फ अनिल यल्लाप्पा बंडीवड्डर याच्याशी अनैतिक संबंध होते. काही दिवसांपूर्वी स्नेहा पतीला सोडून अनिलच्या घरी राहू लागली होती. त्यामुळे मयत सुरेश हा सतत अनिलच्या घरी जाऊन शिवीगाळ करत होता. याच कारणावरून, गावातील काही लोकांनी मध्यस्थी करत गांधीनगर येथील शनि-हनुमान मंदिरात बैठक आयोजित केली होती. परंतु बैठकीदरम्यान वाद उफाळून आला आणि यल्लाप्पा बंडीवड्डर याने चाकूने सुरेशच्या पोटात वार केले. यामुळे त्याची आतडी व पोटगुळगुळ्या बाहेर आले आणि तो जागीच कोसळला. सुरेश याला तातडीने खानापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले, मात्र गंभीर जखमांमुळे प्राथमिक उपचारानंतर त्याला बेळगावला हलविण्यात आले. परंतु वाटेतच त्याचा मृत्यू झाला. या घटनेत सागर अष्टेकर या युवकाच्या हाताला ही गंभीर दुखापत झाली असून, तो सुरेशला वाचविण्याचा प्रयत्न करत होता.

घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक बसर्गी, बैलहोंगलचे डीवायएसपी वीरेश हिरेमठ, खानापूरचे पीआय एल. एच. गोवंडी यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस तपास वेगाने सुरू असून, फॉरेन्सिक लॅबचे पथक देखील घटनास्थळी पोहोचले आहे. त्यांनी रक्ताचे नमुने व इतर पुरावे जमविले आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून, नातेवाईक व मित्रांची कसून चौकशी केली जात आहे.