खानापूर / प्रतिनिधी

खानापूर येथील गांधीनगर भागात किरकोळ वादातून चाकू हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या चाकू हल्ल्यात रमेश (भीमा) बंडीवडर (३०) वर्षीय युवकाचा खून झाल्याची घटना घडली आहे. खानापूर शहरालगत असलेल्या गांधीनगर येथील शनी मंदिर व मारुती मंदिर परिसरात रमेश बंडीवडर आणि यल्लाप्पा बंडीवडर (वय ६२) यांच्यात सुरू असलेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी गांधीनगर येथील जाणकारानी बैठक बोलवली होती मात्र हा वाद मिटण्याऐवजी अधिक पेटला व वादाचे पडसाद हाणामारीत होत यल्लाप्पा यांनी मयत रमेश याच्या पोटावर चाकूने सपासप वार केले. हा हल्ला इतका गंभीर होता की, रमेश याच्या पोटातील आतडी बाहेर आली होती. रमेश याला जखमी अवस्थेत खानापूर येथील आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र अधिक उपचारासाठी त्याला बेळगावला हलवले जात असतानाच वाटेत त्याचा मृत्यू झाला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तात्काळ शनि मारुती मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. खानापूर शहरात सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.