• किरकोळ वादातून घटना

खानापूर : विद्यानगर परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची गंभीर घटना घडली असून, या प्रकरणी खानापूर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे.

खानापूर शहरातील विद्यानगर भागात ११ एप्रिल रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास किरकोळ वादातून सुरू झालेल्या शाब्दिक बाचाबाचीचे पर्यवसान काही क्षणांतच हाणामारीत झाले. या दरम्यान एका तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी श्रेयस देसाई यांना आरोपी ऋषांत पुजारी हा गेल्या महिनाभरापासून लग्न रद्द झाल्याच्या कारणावरून मोबाईलवरून धमकावत होता. याच विषयावर चर्चा करण्यासाठी श्रेयसला विद्यानगर परिसरात बोलावण्यात आले होते. श्रेयस आपल्या मित्र आदर्श कोलेकर व इतरांसह घटनास्थळी पोहोचला असता आरोपीने शिवीगाळ करत वादाला सुरुवात केली.

यावेळी भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या आदर्श कोलेकर यांच्यावर आरोपीने अचानक चाकूने छाती, मान आणि हातावर वार करत गंभीर जखमी केले. हल्ल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

जखमी आदर्श कोलेकर यांच्यावर सध्या बेळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी खानापूर पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करत ऋषांत पुजारीसह आणखी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे खानापूर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.