खानापूर : सरकारी मराठी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने खारीचा वाटा उचलला आहे. त्याचे येणाऱ्या काळात चांगले परिणाम दिसून येतील असे प्रतिपादन महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा कार्यकर्ते अभिजीत सरदेसाई यांनी व्यक्त केले आहे.
युवा समितीच्यावतीने गुरुवारी खानापूर तालुक्यातील करंबळसह विविध गावांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी करंबळ शाळेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमावेळी अभिजीत सरदेसाई यांनी गेल्या अनेक वर्षांपासून युवा समिती मराठीतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन घेण्यासाठी धडपड करीत आहेत. बेळगाव आणि सीमाभागात मराठी शाळांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्या प्रत्येक शाळेपर्यंत जाऊन पोहोचत शैक्षणिक साहित्य वितरण करण्याचा प्रयत्न कौतुकास्पद आहे याला प्रत्येक शाळेतील शाळा सुधारणा कमिटी आणि नागरिकांनी प्रोत्साहन आणि सहकार्य देणे गरजेचे आहे. भाषा आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र एकीकरण समिती प्रयत्नशील आहे. यामध्ये युवा समितीने विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम करून आपली भाषा आणि संस्कृती टिकवण्याच्या दृष्टीने खारीचा वाटा उचलला आहे त्याला येणाऱ्या काळात मोठा प्रतिसाद मिळेल असे मत व्यक्त केले.
मध्यवर्ती समितीचे सदस्य रणजीत पाटील, सुनील पाटील आदींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. करंबळ शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष संदेश कोडचवाडकर यांनी प्रास्ताविक करताना मराठी शाळेचे विकासासाठी आणि शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढावी यासाठी प्रत्येकाने जबाबदारी घेणे गरजेचे आहे असे सांगितले. त्यानंतर मिलिंद देसाई, शाळा सुधारणा कमिटीचे सदस्य कल्लापा पाटील, ग्राम पंचायतचे माजी अध्यक्ष देवानंद घाडी, माजी ग्रा. प. अध्यक्ष सूरज मादार, गोपाळ दळवी, पुंडलिक पाटील आदी उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक भैरू पाटील यांनी स्वागत केले.
युवा समितीच्यावतीने हेब्बाळ, कसबा नंदगड, चन्नेवाडी, भुत्तेवाडी, झुंजवाड, गर्बेनट्टी आदी गावांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी समितीचे कार्यकर्ते मोहन गुरव, विठ्ठल पाटील, हेब्बाळ येथे मुख्याध्यापिका एम. एम. कुंभार, एस. आर. राऊत, एस. एम. काचुगोळ, भुजंग बशेटकर, कसबा नंदगड येथे मुख्याध्यापक ए. एम. शिंदे, व्ही. एस. कांबळे, टी. आर. गुरव तर जुंझवाड येथे ए.आर. जोशी, एम आर तोलापूर, एन. आय. मुचंडी, व्ही. व्ही. देसाई आदी उपस्थित होते.