• एकाच रात्री सहा गावांतील दहा घरे फोडली
  • सावरगाळीत १५ लाख रोकड व सोन्याचांदीचे दागिने लंपास

खानापूर / प्रतिनिधी

खानापूर तालुक्यात पुन्हा एकदा चोरट्यांनी दहशत निर्माण केली आहे. एकाच रात्री सहा गावांतील दहा बंद घरांवर डल्ला मारून चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली असून पोलिसांनी आंतरराज्य टोळीवर संशय व्यक्त केला आहे.

सावरगाळी, गुंजी, शिंपेवाडी, बरगाव, गणेबेल आणि रामगुरवाडी या गावांमध्ये झालेल्या घरफोड्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. सावरगाळीतील नारायण व ओमकार भेकणे यांच्या घरातून चोरट्यांनी तब्बल १५ लाख रुपये रोख, १६ तोळे सोने आणि अर्धा किलो चांदीचे दागिने लंपास केले.

  • चोरट्यांचा धाडसी डाव :

भेकणे कुटुंब रविवारी नातलगांकडे गेले असताना चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडले. कपाटातील रोकड आणि दागिने घेऊन चोरटे फरार झाले. त्याच परिसरातील बाळू घाडी यांच्या घरातूनही सुमारे दोन तोळ्यांचे दागिने चोरीस गेले. या दोन्ही घरांची कुलपे बदलून चोरटे पसार झाले, त्यामुळे चोरीची कल्पना शेजाऱ्यांनाही आली नाही.

  • रामगुरवाडीत वृद्ध महिलेला धमकी देऊन चोरी :

रामगुरवाडी येथे धक्कादायक घटना घडली. रुक्मिणी विठ्ठल गुरव यांच्या घरात घुसलेल्या चोरट्यांनी त्यांच्या तोंडात कापडाचा गोळा कोंबून चाकूचा धाक दाखवला आणि पैशांची चौकशी केली. त्यांच्या हाती फक्त तीन हजार रुपये लागले आणि त्यांनी रुक्मिणी यांना ढकलून पलायन केले. रात्री उशिरा त्यांनी शेजाऱ्यांना बोलावून मदत मागितली.

  • तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली :

घटनास्थळी नंदगड पोलीस निरीक्षक रविकुमार धर्मट्टी व उपनिरीक्षक बदामी पथकासह दाखल झाले. श्वानपथक व ठसे तज्ञांना बोलावण्यात आले असून श्वानपथक महामार्गापर्यंत माग काढत गेले. सीसीटीव्ही फुटेज तपासणी सुरू असून बेळगाव जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस प्रमुख बसरगी आणि बैलहोंगल विभागीय उपअधिक्षक विरय्या हिरेमठ यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची दिशा ठरवली आहे.

  • सुगीचा हंगाम आणि वाढता चोरट्यांचा सक्रियपणा : 

दरवर्षी सुगीच्या काळात ग्रामीण भागात चोरीच्या घटना वाढताना दिसतात. आता पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चोरट्यांनी क्रीडा दाखवली आहे. आगामी भात कापणीचा हंगाम लक्षात घेता नागरिकांनी घरांची सुरक्षितता वाढवावी, असा सल्ला पोलिसांनी दिला आहे.

  • काही सोने सुरक्षित : 

भेकणे यांच्या घरातील माडीवर ठेवलेले पाच तोळे सोने चोरट्यांच्या नजरेतून सुटले. तसेच बाळू घाडी यांच्या घरातील जुन्या ट्रंकेत ठेवलेले तीन तोळ्यांचे सोनेही सुरक्षित राहिले.