- जोयडा तालुक्यातील धक्कादायक घटना
- कुळाचाराच्या कारणावरून उचलले टोकाचे पाऊल
रामनगर / प्रतिनिधी
कौटुंबिक वादातून दिराने वहिनीचा निर्घृण खून केला. शिंगरगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील मालंबा (गवळीवाडा) ता. जोयडा येथे गुरुवार दि. ११ सप्टेंबर रोजी सकाळी ही घटना घडली. धोंडू गंगाराम वरद (वय ५५) असे खून केलेल्या दिराचे तर भाग्यश्री सोनू वरद (वय ३२) असे मृत वहिनीचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहिती अशी की, मृत भाग्यश्री हिचा पती सोनू कामानिमित्त गोवा येथे वास्तव्यास असून, ती आपल्या चार मुलांसह मालंबा येथे राहत होती. गेल्या काही वर्षांपासून धोंडू आणि त्याचा भाऊ सोनू यांच्यात कुळ कोणाकडे राहावे यावरून वाद सुरू होता. दोन वर्षांपूर्वी ग्रामस्थांनी दोघांत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला होता, मात्र वाद मिटला नव्हता. गुरुवारी पुन्हा भांडण होऊन त्याचे पर्यवसान खुनामध्ये झाले. दरम्यान घरासमोरच हा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. वरिष्ठ पोलीस अधिकारी एसपी व डीवायएसपी यांनीही भेट देऊन तपासाची माहिती घेतली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रामनगर येथील आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.