• सीमाप्रश्नी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना खासदार धैर्यशील माने यांचे पत्र

बेळगाव / प्रतिनिधी

सीमा प्रश्नसंदर्भात दोन्ही राज्यांमध्ये शांतता राहावी यासाठी कर्नाटक व महाराष्ट्र या दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची संयुक्त बैठक बोलवावी अशी मागणी कोल्हापूरच्या हातकणंगले मतदारसंघाचे खासदार व तज्ञ समितीचे अध्यक्ष धैर्यशील माने यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

बेळगावसह संपूर्ण सीमाभागात कर्नाटक सरकारकडून कन्नड सक्ती केली जात आहे. सीमा प्रश्नाचा खटला सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. २१ वर्षे उलटली तरी सीमावासियांना न्याय मिळालेला नाही. त्यामुळे केंद्र सरकारने हा प्रश्न न्यायालयाबाहेर सोडवावा. आसाम व मेघालय प्रमाणे बेळगावच्या नागरिकांना न्याय द्यावा. सीमा भागात १५ टक्क्यांहून अधिक मराठी भाषिक असल्याने भाषिक अल्पसंख्यांक आयोगाच्या शिफारसीनुसार त्यांना त्यांचे भाषिक अधिकार द्यावेत.

दोन्ही राज्यांमध्ये शांतता राहावी म्हणून चार वर्षांपूर्वी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये दोन्ही राज्यांच्या तीन मंत्र्यांची एक संयुक्त समिती स्थापन करण्याची सूचना करण्यात आली होती. परंतु अद्याप संयुक्त समिती स्थापन करण्यात आलेली नाही. त्यामुळे दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची संयुक्त बैठक घेऊन शांतता निर्माण करावी असे पत्र पाठवण्यात आले आहे.